यशोदा इन्स्टिट्यूट चा विद्यार्थी साहिल शेवते ची जपानमधील आंतरराष्ट्रीय कंपनीत सिव्हिल इंजिनियर म्हणून निवड
बहुराष्ट्रीय कंपनीतील प्लेसमेंट सोबत 19.2 लाख वार्षिक पॅकेज
सातारा – यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, सातारा ची अभिमानास्पद परंपरा कायम राखत सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्याने, साहिल भानुदास शेवते याने जपानमधील प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कंपनीकडून 19.2 लाख वार्षिक पॅकेज स्वीकारत उत्तुंग यशाची कामगिरी नोंदवली आहे. अलीकडे झालेल्या यशोदा इन्स्टिट्यूट आणि जापनीज कंपनी सोबतच्या सामंजस्य कराराचे हे फलित आहे. विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संधी, कौशल्यविकास व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची फलश्रुती म्हणून ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
फास्ट ऑफर – स्टडी गो वर्क जपान या प्रोग्रामअंतर्गत झालेल्या सिलेक्शन प्रक्रियेमध्ये साहिलने तांत्रिक ज्ञान, संवादकौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अवघड स्पर्धेतून स्वतःला सिद्ध केले. भारत व जपान यामधील शैक्षणिक-औद्योगिक सहकार्याचा फायदा विद्यार्थ्यांना मिळावा या उद्देशाने यशोदा तंत्रशिक्षण समूह सातत्याने प्रयत्नशील असून साहिलची निवड हे त्या प्रयत्नांचे फलित असल्याचे यशोदा इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे यांनी सांगितले.
संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांनी साहिलचे मनःपूर्वक अभिनंदन करताना सांगितले की, यशोदा परिवारात प्रत्येक विद्यार्थी हा आमचा अभिमान आहे. जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान व बदलत्या औद्योगिक गरजांनुसार आमच्या संस्थेत अद्ययावत शिक्षण, उद्योगसहकार्य, मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाची प्रणाली उभी केली आहे. साहिलची कामगिरी भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
यशोदा च्या इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.व्ही एस पाटील, कुलसचिव, सहसंचालक, विभागप्रमुख तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या अधिकाऱ्यांनी यशस्वी प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि सततच्या प्रोत्साहनामुळे झालेल्या या यशाचे श्रेय संपूर्ण यशोदा टीमला दिले. तसेच कुटुंबीयांचे पाठबळ, शिक्षकांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्याच्या चिकाटीचे कौतुक केले.
साहिल शेवते यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “यशोदा कॉलेजमधील शिक्षण, प्रयोगशाळा सुविधा, प्रोजेक्ट मार्गदर्शन, तांत्रिक प्रशिक्षण आणि मॉक इंटरव्ह्यूजमुळे माझा आत्मविश्वास वाढला. जपानमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याने माझ्या करिअरला आंतरराष्ट्रीय दिशा मिळाली आहे.”
यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना भारतासह परदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळवून दिली असून साहिलची निवड या यशकथेतील आणखी एक प्रेरणादायी अध्याय ठरला आहे.




