श्रीराम विठ्ठल मंदिरात काकडा आरती उत्सवाची उत्साहात सांगता.
महाबळेश्वर: येथील श्रीराम विठ्ठल मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोजागरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या काकडा आरती उत्सवाची नुकतीच मोठ्या उत्साहात सांगता झाली. श्रीराम विठ्ठल मंदीर ट्रस्ट, माऊली भजनी मंडळ व काकडा आरती महिला ग्रुपच्या वतीने एक महिनाभर हा भक्तीमय उत्सव पार पडला.
येथे १९५८ सालापासून काकडा उत्सव साजरा करण्याची जुनी परंपरा आहे. या संपूर्ण कालावधीत भाविकांनी पहाटे चार वाजल्यापासून मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तीचा अनुभव घेतला. पहाटेच्या या वेळी पंचपदी, अभंग, भूपाळीचे अभंग, गवळण याशिवाय विठ्ठलाची आरती नित्यनियमाने होत असे. आरतीनंतर रोज अभिषेक करणाऱ्या भक्तांकडून मंदिरात प्रसादाचे वाटप केले जात असे.
भक्तीमय वातावरणात सांगता सोहळा:
काकडा आरती सोहळ्याची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेच्या मंगलदिनी करण्यात आली. या सांगता सोहळ्यात माऊली भजनी मंडळाने आपल्या सुस्वर भजनाने वातावरण अधिक भक्तीमय केले. महिनाभर रोज पहाटे भक्ती भावाने उपस्थित राहणाऱ्या सुमारे ५० ते ६० महिला व पुरुष भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा जड अंतःकरणाने पार पडला. सोहळ्याची सांगता अन्न कोटाच्या प्रसादाने झाली.
उत्सवाला लाभले मोलाचे सहकार्य:
संपूर्ण महिनाभर सुरू असलेल्या या काकडा आरती सोहळ्यासाठी श्रीराम विठ्ठल मंदीर ट्रस्टचे दिलिप शिपटे, रतिकांत तोषणीवाल, सचिन धोत्रे, नितीन परदेशी, अशोक पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
पहाटेच्या भजनासाठी प्रभाकर देवकर, बाबा आखाडे, किसन खामकर, शिरिष गांधी, दत्तात्रय सुतार, सुरेश सपकाळ, श्रीकांत जाधव, अजय आखाडे, मनोहर धोत्रे, शाम जेधे, बुधाजी सुतार, अशोक सावंत, काशिनाथ केंडे, राजाराम माने, लक्ष्मण कदम, सुरेश उगले या पुरुष भाविकांनी परिश्रम घेतले.
तसेच, महिलांमध्ये वनिता भोसले, मंगल शिंत्रे, माधुरी धोत्रे, निलम धोत्रे, विमलताई पार्टे, लिलाताई शिंदे, उषाताई ओंबळे, मंगल पाटील, स्वाती शिपटे इत्यादी महिलांनी या सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा भक्तीमय उत्सव यशस्वीरित्या पार पडला.




