‘ब्लू इकॉनॉमी’ला सहकाराची नवी जोड : मासेमारी व्यवसायाचे सशक्तीकरण!
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने’अंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या नौकांचे उदघाटन व वितरण करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज पहिल्यांदाच आपल्या देशामध्ये मच्छीमारांच्या सहकारी संस्थांना खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या नौका देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने’चा सहकार विभागाशी मेळ घातला. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळामार्फत (NCDC) मच्छीमार सहकारी संस्थांना मोठ्या प्रमाणात कर्ज व अनुदान देत या नौका उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे आभार व्यक्त केले.
आपल्या देशाला ‘एक्सक्लूझिव्ह इकॉनॉमिक झोन’ म्हणून जवळपास 23 लाख चौरस मीटरचा भूप्रदेश लाभला आहे, यामार्फत आपण एक मोठी ‘मरीन इकॉनॉमी’ तयार करू शकतो. जवळच्या भागातल्या मासेमारीमुळे सागरी दुष्काळ, मत्स्य दुष्काळ निर्माण होतो. परंतु खोल समुद्रातील मासेमारीमुळे त्यातून देखील सुटका होते आणि मासेमारीला फायदा होतो. परंतु आपल्याकडे खोल समुद्रातील ‘फिशिंग वेहिकल्स’ आणि ‘ट्रॉलर्स’ नसल्याने त्यावर मर्यादा येत होती. परंतु आता सहकारी क्षेत्रातून मासेमारी सहकारी संस्थांना या नौका मिळाल्यामुळे महाराष्ट्र आणि भारताच्या अर्थव्यस्थेला याचा फायदा होईल, असे मत देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ‘ब्लू इकॉनॉमी’चा विकास करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राने फिशिंग हार्बर, फिशिंग इकोसिस्टीम आणि नौकांच्या इकोसिस्टीममध्ये आघाडी घेतली आहे. यासोबतच महाराष्ट्राने मत्स्य व्यवसायात देशात सर्वाधिक म्हणजेच 45% वाढ केली असल्याचे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
यावेळी 14 पैकी 2 खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या नौकांचे वितरण करण्यात आले आहे. येत्या काळात ट्यूना, अल्बाकोर, स्कीपजॅक, बिलफिश अशा मोठ्या प्रमाणात निर्यात होणार्या माशांचे उत्पादन घेता येणार आहे. महाराष्ट्राला येत्या 5 वर्षांमध्ये मत्स्य व्यवसायात पहिल्या क्रमांकावर आणण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
महाराष्ट्रातील सहकार चळवळीच्या समृद्ध इतिहासावर प्रकाश टाकत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सहकाराचे तत्व लागू केल्यास, मासेमारी करणारा समुदाय सक्षम बनेल. यामार्फत त्यांची दीर्घकालीन सामाजिक आणि आर्थिक प्रगती सुनिश्चित करता येईल.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री नितेश राणे, मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.




