पुणे येथील जैन बोर्डिंग हाऊस जमीन खरेदी व्यवहार रद्द गोखले बिल्डरचा निर्णय
जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री प्रकरणावरुन मोठा वाद झाला होता. याप्रकरणात भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप झाले होते.
पुणे -पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीचा बहुचर्चित विक्री व्यवहार अखेर रद्द होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जैन बोर्डिंग हाऊसच्या विश्वस्तांनी ही जागा गोखले बिल्डर्सला विकली होती. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर आणि राजू शेट्टी यांनी या जमीन व्यवहारावरुन रान उठवले होते. या जमीन विक्री व्यवहारात भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप झाला होता.
मोहोळ यांनी हे आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळूनही लावले होते. मात्र, रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण ताकदीने लावून धरल्याने हा संपूर्ण व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला होता. अखेर विशाल गोखले यांनी रविवारी जैन बोर्डिंग हाऊसला एक ई-मेल पाठवून हा व्यवहार रद्द करण्याची विनंती केली.
विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या चेअरमन आणि ट्रस्टी यांना जमिनीचा व्यवहार रद्द करण्यासंदर्भात ई-मेला पाठवला आहे. धर्मादाय आयुक्तालय यांना सुद्धा पत्र पाठवून पूर्ण व्यवहार रद्द झाल्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे ई -मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी धर्मादाय आयुक्तांनी या व्यवहाराला स्थगिती दिली होती. गोखले बिल्डर्सकडून या जमीन व्यवहारासाठी जैन बोर्डिंग हाऊसला 230 कोटी रुपये देण्यात आले होते. हे पैसे लवकरात लवकर परत देण्यात यावेत, अशी मागणी विशाल गोखले यांनी ई-मेलमध्ये केली आहे.
गोखले बिल्डर्सकडून जैन बोर्डिंग हाऊसचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर खासदार मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी रात्री साडेदहा वाजता राजू शेट्टी यांना फोन केल्याची माहिती समोर आली होती. जैन बोर्डिंगमध्ये अनेक संघटना काम करतात त्यांची बैठक झाली. काल मला मुरलीधर मोहोळ यांचा फोन आला होता. व्हॉट्सॲपवरून त्यांनी मला गोखले बिल्डर्सने हा व्यवहार रद्द केल्याचे पत्रही पाठवले. पण आम्ही पूर्णपणे समाधानी नाही, 3.5 एकर जागेवर गोखले यांचे नाव आहे. ट्रस्टने पुढे आलं पाहिजे आणि हे नाव काढून पूर्ण व्यवहार रद्द केला पाहिजे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले.



