छळ करणाऱ्या आरोपींचा तळहातावर उल्लेख करत डॉक्टर तरुणीची आत्महत्या!
साताऱ्यातील फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने शहरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी तिच्या तळहातावर सुसाइड नोट लिहिली असून, त्यात तिने दोन पोलिस अधिकाऱ्यांवर बलात्कार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
डॉक्टर महिलेने सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे की पोलीस उपनिरीक्षका ने तिच्यावर वारंवार बलात्कार केला होता. तिचा सलग चार महिने मानसिक छळ केला होता. या घटनेनंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. महिलेच्या हातावरील सुसाइड नोटची आता फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. दुसऱ्या बाजूला या घटनेने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
फलटणमधील या घटनेने महाराष्ट्र हादरला असून नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले पोलीसच बलात्कार करत असतील तर जनतेने कोणाकडे पाहायचं? असा प्रश्न शिवसेनेच्या (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. तसेच राज्याचा गृहविभाग झोपलाय की काय? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
सुसाइड नोटमध्ये काय लिहिलंय?
माझ्या मरण्याचे कारण पोलीस निरीक्षक गोपाळ बदने ज्याने माझा पाच वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर ज्याने मागील पाच महिन्यांपासून माझा शारीरिक व मानसिक छळ केला.”
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी या घटनेवर सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, “फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या ही महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा कसा बोजवारा उडाला आहे याचे निदर्शक आहे. कायद्याचे रक्षक असलेले पोलीसच जर भक्षक बनत असतील तर यापेक्षा काय वाईट आहे? या डॉक्टर महिलेने पीएसआय बदनेने चार वेळा अत्याचार केला. पोलिस प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिला असं सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे. या महिलेला काय त्रास सहन करावा लागला असेल याची कल्पना करवत नाही. सुशिक्षित महिलेला असे पाऊल उचलावे लागत असेल तर सामान्य महिलांची काय परिस्थिती असेल? ज्यांच्याकडून सुरक्षेची हमी मिळाली पाहिजे तेच मारेकरी झाले तर काय करायचे? या नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालले पाहिजे.



