अत्याधुनिक संरक्षण आणि एअरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनतेय नागपूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सोलर डिफेन्स अँड एअरोस्पेस लिमिटेड’ला संरक्षण व एअरोस्पेस उपकरणांच्या निर्मितीसाठी मिहान एसईझेड, नागपूर येथील सुमारे 223 एकर भूखंडाचे वाटपपत्र अटींच्या अधीन राहून प्रदान केले. सोलर डिफेन्स अँड एअरोस्पेस’ कंपनी संरक्षण क्षेत्रात ₹12,080 कोटींची गुंतवणूक करत आहे. मिहान आर्थिक क्षेत्रात ₹680 कोटींची गुंतवणूक करुन डिफेन्स अँड एअरोस्पेस उपकरण निर्मिती केंद्र स्थापन करणार आहे. या प्रकल्पामुळे 400 प्रत्यक्ष व 1000 अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
सोलर डिफेन्स अँड एअरोस्पेसच्या या नव्या विस्तारित प्रकल्पामुळे नागपूरला देशातील प्रमुख संरक्षण व एअरोस्पेस उत्पादन केंद्र म्हणून नवी ओळख प्राप्त होणार असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. हा उपक्रम महाराष्ट्राच्या ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि औद्योगिक प्रगतीच्या विकासासाठी अधिक बळकटी देणारा ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी ‘सोलर डिफेन्स अँड एअरोस्पेस लिमिटेड’ कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, मनीष नुवाल, राघव नुवाल यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.




