“मी लढणार आणि जिंकणार!” — भिलार गणातून पूनम गोळे यांची जोरदार उमेदवारी, महिलांच्या न्यायहक्कांसाठी ठाम भूमिका
पांचगणी प्रतिनिधी -महाबळेश्वर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रभावी आणि महत्त्वपूर्ण मानला जाणारा भिलार गण यावेळी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठरला असून, या गणातून पूनम निलेश गोळे (कांबळे), कासवंड यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे.
दिवंगत बाळासाहेब भिलारे यांनी अनेक वर्षे या गणाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर आता या गणात नव्या पिढीतील महिला नेतृत्व म्हणून पूनम गोळे पुढे येत आहेत.
पूनम गोळे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “मी कोणत्या पक्षातून लढणार हे गौण आहे — मी लढणार आणि जिंकणार. माझी उमेदवारी ही सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी स्वयंस्फूर्तीने आहे.”
भिलार व पाचगणी परिसरात त्यांनी महिलांच्या सामाजिक न्याय, शिक्षण आणि हक्कांसाठी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे.
स्वतः सुशिक्षित, उच्चशिक्षित आणि प्रशासनातील जाण असलेल्या पूनम गोळे म्हणाल्या,“मी कोणाच्याही दबावाखाली नाही. माझी उमेदवारी ही लोकशाहीचा उत्सव आणि भारतीय राज्यघटनेच्या आत्म्याला सलाम करणारी आहे. लोकहिताची जबाबदारी मला नेहमी जाणवेल.”
सध्याच्या आरक्षणामुळे महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय समीकरणे नव्याने बदलली असून, यंदाची निवडणूक राष्ट्रवादी (अजित पवार गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप, अपक्ष यांच्यात तगड्या लढतीची होण्याची चिन्हे आहेत.
आरक्षणानंतर भिलार गणात हालचालींना वेग आला असून, पूनम गोळे यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात नव्या महिला नेतृत्वाचा उदय झाल्याची चर्चा सर्वत्र आहे.
