भाजपवर बी.एम. संदीप यांचा जोरदार प्रहार — “अडाणींसाठी मोदींना वेळ, शेतकऱ्यांसाठी नाही”
सातारा — अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी बी.एम. संदीप यांनी सातारा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी अडाणी एअरपोर्टसाठी महाराष्ट्रात येतात, पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटायला त्यांना वेळ नाही,” अशा शब्दात त्यांनी भाजपवर हल्ला चढवला. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, “शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, बेरोजगारी वाढतेय, आणि आरएसएस-भाजपच्या विचारधारेमुळे देशाचे नुकसान होत आहे.”
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना संदीप म्हणाले की, “स्थानिक नेत्यांच्या चर्चेबरोबर सर्वांना बरोबर घेऊन निवडणुकीस सामोरे जाणार आहोत.” काँग्रेसमध्ये राहून भाजपला मदत करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या कार्याचे कौतुक करताना बी.एम. संदीप यांनी सांगितले की, “देशमुख यांनी पक्षवाढीसाठी केलेल्या कार्याचा उचित सन्मान करण्यात येईल आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल.”
यावेळी त्यांनी ‘वोट चोरी’चा मुद्दाही उपस्थित करत भाजपवर आरोप केला की, “भाजप कशा पद्धतीने मतांची चोरी करते हे काँग्रेसने उघड केले आहे.”पत्रकार परिषदेला सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
