औंध संगीत महोत्सवाच्या ‘रियाझ’ स्मरणिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते
औंध – औंध संगीत महोत्सवाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘रियाझ’ या स्मरणिकेचे प्रकाशन राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित पवार यांच्या हस्ते छोटेखानी अनौपचारिक समारंभात संपन्न झाले.
स्वातंत्र्यपूर्व काळात लोकशाही रूजवण्याची आणि कला, संस्कृती, शिक्षण, संगीत विषयक जाणीवा समाजात जागवण्याची परंपरा औंध संस्थानने निर्माण केली होती. या परंपरेचा वारसा अखंड ठेवण्यासाठी गेल्या आठ दशकांहून अधिक काळ औंध संगीत महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्य सातत्याने सुरु आहे. या कार्याचा विस्तार आणि सातत्य राखण्यासाठी शासन पातळीवरून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या ओघवत्या शैलीत व्यक्त केले. यावेळी मंत्री मकरंदआबा पाटील, खा. नितिनकाका पाटील यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, , जिल्हा परिषद कार्यकारी अध्यक्षा यांच्यासह विख्यात गायक आणि शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानचे विश्वस्त पं. अरुण कशाळकर, पं. उल्हास कशाळकर, पं. सुरेश तळवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पं. अरुण कशाळकर यांनी आपल्या मनोगतात महोत्सवासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच औंध परिसरात भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण देण्यासाठी ‘गुरुकुल’ स्थापन करण्याचा मनोदय व्यक्त करून त्यासाठी शासनाकडून सहकार्य मिळावे, अशी विनंतीही त्यांनी केली.
