सातारा जिल्हा बँकेत ‘पेपरलेस बँकिंग’चा आधुनिक उपक्रम!
सातारा (अली मुजावर )सातारा जिल्हा सहकारी बँक (Satara District Co-operative Bank) आता पूर्णपणे डिजिटल युगात पाऊल टाकत आहे. बँकेने बँकिंग क्षेत्रातील सर्वोत्तम आणि अत्याधुनिक अशी ‘फिनॅकल’ (Finacle) कोअर बँकिंग प्रणाली स्वीकारली असून, त्यामुळे बँकेचे व्यवहार अधिक सुरक्षित, वेगवान आणि पारदर्शक होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर बँकेचे अध्यक्ष खा. नितीनकाका पाटील,उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक प्रभाकर घार्गे, राजेंद्र राजपुरे, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळाने इन्फोसिस (Infosys) कंपनीच्या बंगळुरू कार्यालयाला भेट देऊन फिनॅकल प्रणालीवरील तांत्रिक आणि सायबर सुरक्षेविषयी सविस्तर चर्चा केली.
या भेटीत सायबर सिक्युरिटी, कोअर बँकिंग सोल्युशन (CBS) आणि ग्राहककेंद्री सेवा यावर विचारमंथन झाले.या प्रसंगी बँकेच्या वतीने “सातारा जिल्हा बँक ‘पेपरलेस बँकिंग’चा अवलंब करणार आहे,” असे स्पष्ट करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर सेवा देणे हे बँकेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी या वेळी बँकेच्या आर्थिक प्रगतीचा सविस्तर आढावा सादर केला.या नवीन उपक्रमामुळे बँकेच्या कामकाजात पारदर्शकता वाढेल, वेळेची बचत होईल आणि पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळेल.
