कफ सिरपमुळे 11 मुलांचा मृत्यू? भारत सरकारनं जारी केली मार्गदर्शक तत्वं
गेल्या महिन्याभरात मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील 11 आणि राजस्थानमधील 3 मुलांच्या मृत्यूनंतर दोन्ही राज्यांच्या आरोग्य व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या मुलांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, कफ सिरप प्यायल्यानंतर मुलांचं आरोग्य वेगानं बिघडू लागलं आणि परिणामी त्यांना वाचवता आलं नाही.
मध्य प्रदेशातील ड्रग कंट्रोल विभागानं शनिवारी (4 ऑक्टोबर) सकाळी तामिळनाडूत बनणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरपवर बंदी आणली होती. त्यानंतर सरकारी डॉक्टर प्रवीण सोनी, कफ सिरप बनवणारी कंपनी श्रीसन फार्मास्युटिकल्सचे संचालक आणि इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.परसरिया ब्लॉकचे वैद्यकीय अधइकारी डॉ. अंकित सहलाम यांच्या तक्रारीनंतर कारवाई करण्यात आली.
या मृत्यूंनंतर, 1 ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेश सरकारनं तामिळनाडू सरकारला पत्र लिहून औषध निर्मात्या कंपनीची चौकशी करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर तामिळनाडूच्या ड्रग कंट्रोल विभागानं चौकसीत श्रीसन फार्मास्युटिकल्स कंपनीत बनणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरपमध्ये ‘भेसळ’ असल्याला दुजोरा दिला होता.
दुसरीकडे, राजस्थानमध्येही कथितरित्या सरकारी हॉस्पिटलमध्ये कफ सिरपमुळे भरतपूर आणि झुंझुनू जिल्ह्यातील दोन मुलांचा मृत्यू झाला. शनिवारी (4 ऑक्टोबर) चुरू जिल्ह्यातही एका मुलाच्या मृत्यूची माहिती समोर आली. या मुलांचा मृत्यू कफ सिरपमुळे झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.
राजस्थानचे आरोग्य मंत्री गजेंद्र सिंह खिंवसर यांनी म्हटलं की, “औषधांची आम्ही चौकशी केली, त्यात असा कोणताच पदार्थ आढळला नाही, जो जीवघेणा असेल. औषधांमुळे यातला कोणताच मृत्यू झालेला नाही. तरीही प्रकरणाच्या चौकशीसाठी आम्ही एक समिती बनवलीय.”
भारत सरकारनं जारी केली मार्गदर्शक तत्वं
लहान मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी कफ सिरप आणि सर्दीवरील औषधांच्या वापराबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार बालरोग तज्ज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लहान मुलांना ही औषधे देताना विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, दोन वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीवरील कोणतीही औषधे देऊ नयेत. तसेच, पाच वर्षांखालील मुलांसाठी ही औषधे सामान्यतः शिफारस केलेली नाहीत. कारण, लहान मुलांमधील तीव्र कफ आणि सर्दीचे बहुतांश आजार स्वतःहून बरे होतात आणि त्यासाठी औषधांची गरज पडत नाही.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 3, 2025
सर्व आरोग्य केंद्रे आणि दवाखान्यांनी केवळ उत्तम उत्पादन मानकांनुसार (GMP) तयार केलेली आणि उच्च औषधी दर्जाची कफ सिरप खरेदी करावीत, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद आहे.
या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी सर्व दवाखाने, जिल्हा आरोग्य विभाग, औषध वितरण केंद्रे, प्राथमिक आणि सामुदायिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये तसेच वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये तातडीने करावी, असे निर्देश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत.
*तज्ज्ञ काय सांगतात?*
पीडियाट्रिशियन डॉ. अवेश सैनी यांच्याशी बीबीसी हिंदीच्या प्रतिनिधींनी बातचित केली.
सर्वसामान्य व्यक्ती औषधं खरी आहेत की बनावट, हे कसे ओळखू शकते, असा प्रश्न डॉ. सैनी यांनी विचारला असता, त्यांनी सांगितलं, “सिरपची बांधणी (फिजिकल अपीअरन्स) कशी आहे? त्याचा रंग ढगाळ दिसतो का, बदलला आहे का किंवा त्यात काही कण दिसत आहेत का? औषधातील मीठ खाली बसले आहे का? बॅच नंबर लिहिलेला नाही किंवा पुसून टाकलेला आहे का? असे संकेत दिसत असतील, तर शंका घेण्यास वाव आहे. तसंच, औषधावर ड्रग लायसन्स नंबर लिहिलेला असणेही आवश्यक आहे. तो नसेल तर अशी औषधे घेऊ नयेत.”
डॉ. सैनी पुढे सांगतात, “असे नाही की दोन वर्षांखालील मुलांबाबतच्या गाईडलाइन्स आत्ताच आल्या आहेत. त्या आधीपासूनच आहेत. दोन वर्षांखालील मुलांवर कोणतीही स्टडी नाही. त्यामुळे ही औषधे दोन वर्षांवरील मुलांनाच दिली जातात.”
किती डोस द्यावा, याबाबत ते म्हणतात, “औषधाचा डोस ठरलेला असतो, जो डॉक्टर सांगतात. तो वजनानुसार असतो. म्हणून औषध देण्यापूर्वी मुलांचे वजन केले जाते.”
बनावट सिरपमुळे आणखी कोणत्या समस्या होऊ शकतात, याबाबत ते सांगतात, “श्वास घेण्यास त्रास, पोटदुखी होऊ शकते. हे किडनीवर परिणाम करू शकते. सर्व केमिकल्स शरीरात साचतात आणि मग ब्रेनवर परिणाम होतो. त्यानंतर झटके (दौरे) येऊ शकतात आणि हृदयाचे ठोके थांबू शकतात.”




