तमिळनाडूतील चेंगराचेंगरीत ३६ जणांचा मृत्यू; अभिनेता विजयच्या सभेतील घटना, मृतांमध्ये सहा मुलांचा समावेश
चेन्नई- तमिळनाडूच्या करुर येथे ‘तमिलगा वेत्री कळ्ळगम’ (टीव्हीके) पक्षाचे प्रमुख तथा अभिनेते विजय यांच्या सभेला प्रचंड गर्दी होऊन झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ३६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
राज्याचे आरोग्य मंत्री मा. सुब्रमण्मय यांनी ही माहिती दिली. मृतांमध्ये सहा लहान मुलांचा समावेश असून, या घटनेत डझनभर महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींपैकी अनेक जण गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
विजय हे लोकप्रिय अभिनेते असून त्यांना पाहण्यासाठी सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. पोलिसांच्या माहितीनुसार करुर येथे सायंकाळी होणाऱ्या या सभेसाठी नागरिक दुपार पासूनच उपस्थित होते. सभेला अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होती. विजय यांचे आगमन झाल्यानंतर भाषणाला सुरुवात होताच सभास्थळी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. यानंतर विजय यांनी आपले भाषण थांबवत पोलिसांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. नागरिकांची पळापळ सुरू झाल्याने अनेकजण एकमेकांच्या अंगावर कोसळून बेशुद्ध पडले. जखमींना तत्काळ करुर सरकारी रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी ३५ जणांना मृत घोषित केले. तर ४५ हून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेनंतर गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंत्री, वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांनी करुरला धाव घेतली. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सचिवालयात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. ‘करुरमधील घटना चिंताजनक आहे. जखमींना सर्व मदत उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना आदेशित केले आहे,’ असे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सांगितले.
