Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » सायबर सेफ राजधानी सातारा

सायबर सेफ राजधानी सातारा

सायबर सेफ राजधानी सातारा

सातारा -यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा (YTC) येथे नुकत्याच झालेल्या फर्स्ट इयर इंडक्शन प्रोग्रॅम अंतर्गत क्विक हील क्लब CSE विभागा तर्फे “सायबर सेफ राजधानी सातारा” हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये तसेच समाजात सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नुक्कड नाटकाच्या माध्यमातून सायबर सुरक्षेचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. नाट्यप्रयोगात ऑनलाईन फसवणूक, खोटे ई-मेल्स, OTP फसवणूक, बनावट लिंक, मजबूत पासवर्डचे महत्त्व, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी अशा दैनंदिन जीवनाशी निगडीत वास्तव घटनांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे उपस्थितांना सायबर सुरक्षेच्या संकल्पना अधिक स्पष्ट व वास्तवदर्शी पद्धतीने समजावल्या गेल्या.

या विशेष उपक्रमाला यशोदा टेक्निकल कॅम्पसचे प्राचार्य डॉ. विक्रम पाटील सर आणि संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. सरिता बलशेटवार मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. विक्रम पाटील सरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “डिजिटल क्रांतीच्या या युगात सायबर सुरक्षा ही केवळ तांत्रिक बाब नाही तर सामाजिक जबाबदारीदेखील आहे. विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमधून शिकून स्वतः सुरक्षित राहावे आणि समाजालाही सुरक्षित ठेवण्याचे कार्य करावे.”

तसेच डॉ. सरिता बलशेटवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अधोरेखित केले की, “सायबर सुरक्षा हे संगणक अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाचा अविभाज्य घटक आहे. नाट्यप्रयोगांसारख्या सृजनशील माध्यमांतून दिलेली माहिती विद्यार्थ्यांना जास्त प्रभावीरीत्या लक्षात राहते. क्विक हील क्लबच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर जागरूकता निर्माण झाली असून हा उपक्रम समाजासाठीही उपयुक्त ठरेल.”

या कार्यक्रमामुळे सायबर सुरक्षेबाबत सकारात्मक संदेश केवळ कॅम्पसच्या आतच नाही तर विद्यार्थ्यांमार्फत बाहेरील समाजातही पोहोचला. विद्यार्थ्यांनी दाखवलेली उत्स्फूर्तता, सादरीकरणातील प्रामाणिकपणा आणि जनजागृतीची भावना प्रेक्षकांनी मनापासून दाद देऊन कौतुकास्पद ठरवली.

यामुळे यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या फर्स्ट इयर इंडक्शन प्रोग्रॅमला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले असून, “सायबर सेफ राजधानी सातारा” हा उपक्रम यशस्वी आणि प्रभावी जनजागृती मोहीम म्हणून नोंदला गेला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात

Post Views: 4 शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात सातारा: करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील

Live Cricket