कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » देश » धार्मिक » नागेवाडीची श्री शाकंभरी देवी

नागेवाडीची श्री शाकंभरी देवी

नागेवाडीची श्री शाकंभरी देवी

साताऱ्याहून महामार्गाने पुण्याला जाताना लिंबखिंड ओलांडली की अंदाजे दहा किलोमीटर अंतरावर नागेवाडी हे गाव लागते. या गावामध्ये श्री शाकंबरी देवीचं मंदिर थांबून पाहण्यासारखं आहे. महामार्ग सोडून डाव्या हाताला वळून आपल्याला श्री शाकंभरी देवीच्या मंदिराकडे जाता येते. 

हायवेपासून अगदी अर्ध्या कि.मी. अंतरावर झाडांमध्ये आणि शेतांच्या बाजूला हे मंदिर आहे. हे ठिकाण गावाच्या थोडे बाहेर असल्याने या परिसरात वर्दळ कमी असते. एक मोठी कमान पार करून उजव्या हाताला थोडे पुढे गेल्यावर लांबूनच आपल्याला या मंदिराच्या कळसाचे दर्शन होते. काळ्या पाषाणात आणि हेमाडपंती शैलीत बांधलेलं हे मंदिर पाहताच तिथं जाण्याचा मोह न आवरणारा असतो. मंदिर परिसर निसर्गरम्य शांत आणि स्वच्छ असून चारही बाजूने उसाच्या शेतीने वेढलेला आहे.

पाषाणात बांधल्या गेलेल्या या मंदिराचा परिसर विस्तीर्ण आहे. मंदिराच्या प्रचंड आवारामध्ये त्याला साजेसंच श्री शाकंबरीचं मंदिर आहे. मोठे सभागृह आणि गाभारा अशी मंदिराची रचना आहे. देवीचं मंदिरएक मीटर उंचीच्या चौथऱ्यावर बांधलं असून त्याची बांधणी अत्यंत साध्या प्रकारची पण आकर्षक आहे. 

गाभाऱ्यात चांदीच्या प्रभावळीत काळ्या पाषाणातील श्री शाकंभरी मातेची अष्टभुजा मूर्ती स्थित आहे.या मूर्तीला आठ हात असून त्यामध्ये शस्त्रे धरलेली आहेत. गाभाऱ्यातील देवीची मूर्ती काळ्या पाषाणाची आणि मीटरभर उंचीची आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला चवरी ढाळणाऱ्या दासीशिवायएक-एक वादिका आहेत.मंदिरात जात असताना मंदिराच्या दरवाज्यावर गणेशाची प्रतिमा आपल्याला प्रथम पहावयास मिळते. तसेच भिंतीवर विठ्ठल रुक्माई यांच्या मुर्त्या आपले स्वागत करतात. 

या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे देवीची ही मूर्ती शरभारूढ आहे. शाकंबरी म्हणजे बनशंकरी (भुवनेश्वरी) या देवीचं रूपआणि तिचं वाहन आहे वाघ. पण या ठिकाणी मात्र शरभ हे वाहन आहे. शिवायया देवीला दाखविला जाणारा नैवेद्यही वेगळ्या प्रकारचा म्हणजेच भाज्यांचा नैवेद्य दाखविला जातो. मातेच्या मूर्तीसमोरच एक शिवपिंड दिसून येते. ही देवी देवांग कोष्टी समाजाची कुलस्वामिनी असून ती नवसाला पावते अशी श्रद्धा असल्याने वर्षभर भक्तगणांची गर्दी येथे दर्शनासाठी होत असतेविशेष करून मंगळवार आणि शुक्रवारी खूप गर्दी असते. नवरात्रीत या देवीचा खूप मोठा उत्सव साजरा केला जातो त्यावेळी परिसरातून मोठ्या संख्येने महिला भक्तगण देवीदर्शनासाठी येतात. मंदिराचा मंडप गाभाऱ्यापेक्षा आकाराने थोडा मोठा आहे. येथे काही देवतांचे फोटो मात्र लावलेले दिसतात.

मुख्य मंदिरासमोर एक अतिशय सुंदर मोठी आणिबांधीव विहीर असून पायऱ्यांवरून विहिरीत उतरता येते. थोडंसं दुरून पाहिल्यास या विहिरीचा आकार शिवलिंगासारखा असल्यासारखा आपल्याला दिसतो.या विहिरीतले पाणी देवीच्या नित्यपूजा आणि अभिषेकासाठी वापरण्यात येते. 

पार्वतीचे रूप असलेली श्री शाकंभरी देवी ही भाजीची देवी असल्याचे म्हटले जाते. माता शाकंभरीला देवी वनशंकरी आणि शताक्षी असेही म्हटले जाते. देवी भागवत महापुराणात शाकंभरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप असे केले आहे. पुराणानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकराला मिळविण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्यांचे सेवन केले. म्हणूनच तिला श्री शाकंभरी असे नाव पडले.

दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार ती म्हणजे पुराणकाळात प्रचंड दुष्काळ पडला. इतका की लोकं होम-हवन, जप-तप करायचे विसरू लागले. सगळीकडे अन्नाची मारामार पसरली. त्या वेळी सर्व लोक भुवनेश्वरी देवीला शरण आले. तेव्हा मानवांचे दुःख पाहून ऋषींनी या मातेची प्रार्थना केली. मग शाकंभरीच्या रूपाने मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वनौषधींमधूनच विश्वाचे पालन पोषण केले. त्या वेळेस देवीने आपल्या हजारो नेत्रांनी सृष्टी पाहिली आणि त्या नेत्रांपासून भाज्या तयार केल्या आणि अभय देऊन सांगितले की, जोवर जमिनीवरील हा दुष्काळ संपत नाही तोवर तुम्ही माझ्या नेत्रांतून तयार होणाऱ्या भाज्या खाल. हजारो नेत्रांनी पाहणाऱ्या या देवीला त्यामुळेच शाकंबरी हे नाव पडले आणि तिला भाज्यांचा नैवेद्य दाखविला जाऊ लागला. 

हा नैवैद्यही प्रत्येक भाविक आपल्या ऐपतीप्रमाणे करतो. पण देवीला चौसष्ट आणि त्यापेक्षा जास्त भाज्यांचा नैवेद्य या ठिकाणी दाखविला जात असल्याचं सांगतात. त्यामुळे शाकंभरी जयंतीच्या दिवशी फळे, फुले आणि हिरव्या भाज्या दान करण्याचे खूप महत्त्व आहे असे सांगितले जाते.

नागेवाडी हे मूळ ठिकाण श्री चौंडेश्वरी देवीचे मूळ स्थान होते. या ठिकाणी तिची मैत्रीण श्री शाकंबरी देवी आली असता ते ठिकाण श्री शाकंबरी देवीला खूप आवडले तिने या ठिकाणीच वास्तव्य केले. ही भूमी श्री वाघेश्वरी, श्री देवी शाकंभरी,श्री चौंडेश्वरी देवी,श्री मरीआई देवी आणि श्री पद्मावती देवी या पाच देवीच्या पवित्र वास्तव्याने पावन झालेली भूमी असून या पाचही देवींचे वास्तव्य नागेवाडीच्या पवित्र ओढयावर असलेले दिसते. 

या सर्व परिसरापासून श्री पद्मावती मंदिर हे थोडेसे दूर असून त्या ठिकाणीचा परिसर प्रशस्त आणि हिरवागार आहे. 

श्री देवी शाकंभरी मंदिरासमोर आणि मंदिरासमोरील विहिरीच्या मागे श्री चौंडेश्वरी देवी, श्री गणपती आणि श्री मरीआई देवीची लहान मंदिर आहेत. शिवाय आवाराच्या सुरुवातीस लहान समाधीमंदिर आहे. नागेवाडी गावापासून अंदाजे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंब गावात पुरातन कोटेश्वर मंदिर आणि बारा मोटांची विहीर ही ठिकाणेही बघण्यासारखी आहे.

शाकंभरी नवरात्रोत्सव पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होतो आणि पौष पौर्णिमेपर्यंत चालतो. याला शाकंभरी नवरात्रोत्सव असेही म्हणतात. पौष महिन्यातील पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी माता शाकंभरीची जयंती साजरी केली जाते. सहारनपूरच्या शिवालिक परिसरात शाकंभरी देवीची मोठी जत्रा भरते.

शाकंभरी मंदिराचे पुजारी श्री. दिलीप खाशाबा सावंत (संपर्क नंबर ७८८७३७९१५२) यांच्याशी संपर्क साधल्यास नागेवाडी येथे निवास भोजनाची घरगुती सोय होऊ शकते शिवाय नागेवाडीचे रहिवासी श्री. धीरज सावंत (संपर्क नंबर ९३०९२३१११२) हे मंदिराविषयी अधिकाची माहिती देतात. सातारा शहर येथून जवळच असल्याने येथे निवास भोजनाचे पर्याय सुद्धा उपलब्ध होऊ शकतात.

सहा.प्रा.सुर्यकांत शामराव अदाटे

प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय,

देऊर

९९७५७५९३२५

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket