Home » देश » धार्मिक » पारचे ग्रामदैवत श्रीरामवरदायिनी माता

पारचे ग्रामदैवत श्रीरामवरदायिनी माता

पारचे ग्रामदैवत श्रीरामवरदायिनी माता

नवरात्रीत सर्वात जास्त गर्दी होत असलेले आणिहिरव्यागार निसर्गाच्या कुशीतीलपार या ऐतिहासिक गावात भवानीरूपी रामवरदायीनीचे शिवकालातील मंदिर आहे.श्रीरामवरदायिनी हीसातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील मौजे पारसोंड या गावाची ग्रामदेवता आहे. श्री क्षेत्र पार्वतीपूर (पार) हे गाव महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वराच्या पश्चिमेस रडतुंडीच्या घाटापासून सहा मैल अंतरावर आहे. पार हे गाव प्रतापगडाच्या दक्षिणेला पायथ्याशी वसलेले आहे. 

महाबळेश्वर – पार या रस्त्याने ते महबळेश्वरपासून २० मैलावर येते. छत्रपती शिवाजीराजे यांचा काळापासूनपार्वतीपूर (पार) ही एक बाजारपेठ होती. सातारा – वार्इ – मेढा त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर इत्यादी ठिकाणाहून व्यापारी लोक पारला येऊन मोठा बाजार भरवीत असत. या व्यापारी पेठेचे विभाजन करून पारपार, पेठपार व सोंडपार अशी तीन गावे निर्माण केली व त्यांसाठी वेगवेगळी मुलकी व पोलीस पाटलांची व्यवस्था केली.

श्री आदिशक्ती श्रीरामवरदायिनी हे महाराष्ट्रातील एक जागॄत शक्तीपीठ आहे. ही महाराष्ट्रातील सर्व हिंदू – मराठा सरदार, कुलवंत मराठा घराणी आणि समस्त वीरशैव समाज या सर्वांची कुलदेवता आहे.मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात सिंहासनावर दोन मूर्ती आहेत. डाव्या बाजूस असलेली अडीच फूट उंचीची मूर्ती “श्री वरदायिनी” या नावाने आणिउजव्या बाजूची तीन फूट उंचीची मूर्ती “श्रीरामवरदायिनी” या नावाने ओळखली जाते. जावळीच्या चंद्रराव मोरे यांची रामवरदायीनी ही कुलदेवता. प्रत्यक्ष शिवराय व समर्थ रामदास स्वामी यांचा या मंदिराशी संबंध आलेला आहे.

प्रभु श्रीरामचंद्रांना वर देणारी अशी आख्यायिका याच देवीबाबत सांगितली जाते. अर्थात रामवरदायिनीची स्थापना प्रभु रामचंद्रांनी केली अशी श्रीरामवरदायिनीची आख्यायिका एकनाथ महाराजांनी आपल्या भावार्थ रामायणातील अरण्यकांड या भागात आणि पुढे श्रीधरस्वामींनी आपल्या रामविजय ग्रंथात कथन केली आहे.सध्याच्या या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शिवाजी महाराजांनी केली असली तरी त्यापूर्वीच्या पुरातन काळामध्ये खुद्द ब्रम्हा‚ विष्णू आणि महेश यांनी या वरदायिनी देवीची स्थापना केली आहे अशी आख्यायिका सांगितली जाते.

श्रीरामवरदायिनी आईचे भव्यदेऊळ हेमाडंपंथी पद्धतीने बांधण्यात आले आहे. अलीकडेच या मंदिराचे कळसासहित सुशोभीकरण केले असल्याने मंदिराच्या सौंदर्यात भर पडली आहे. पार हे सह्याद्रीच्या कुशीत घनदाट वनराईत नटलेले हे गाव असून, निसर्गाने अतिशय उदार अंतःकरणाने अनोखे असे सॄष्टिसौंदर्य ह्या पावन परिसराला बहाल केले आहे. जवळूनच वाहणारी कोयना नदी व शिवाजीच्या काळात या नदीवर बांधलेला प्राचीन पूल हे या गावाच्या सौंदर्याचे आणखी एक आभूषण आहे.

ह्या देवीची जत्रा वर्षातून दोन वेळा भरते. वार्षिक यात्रोत्सव चैत्र वैद्य त्रयोदशी पासून सुरू होऊन तो वैशाख शुद्ध षष्ठी पर्यंत चालू असतो. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच चैत्र अमावस्येला आसपासच्या गावांमधून त्या त्या गावचे ग्रामदैवत गुढीच्या काठीच्या रूपात घेऊन येतात. मुख्य सभा मंडपासमोर असलेल्या पटांगणात एक प्राचीन झाड आहे तेथे बगाड लागते. यात्रेचा शेवटचा दिवस असतो याला छबिना म्हणतात. या दिवशी मंदिरात लघुरूद्रभिषेक, होमहवन तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते व पहाटे पाच वाजता देवीची मूर्ती पालखीत ठेवून पालखीची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. तर नवरात्रीमध्ये देवीच्या मंदिरात घटस्थापना करून नऊ दिवस देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात व थाटामाटात केला जातो.

पार गावचा इतिहास पाहता आपल्याला पहावयास मिळते कि विजापूरहून येताना अफझलखानाने तुळजापूरांस जाऊन एक मूर्ती फोडली व त्याच्या अगोदर एक मूर्ती पार घाटास आली. प्रतापगड बांधण्यापूर्वीच ही मूर्ती रामदासांनी पार गावात आणून तिची स्थापना केली. महाराष्ट्रात अनेक तीर्थक्षेत्रे असतानाही रामदासांनी या दुर्गम आणि डोंगराळ भागातच ही मूर्ती आणली कारण त्यांचाप्रवास चाफळ ते शिवघरघळीपर्यंत होत असे. 

या प्रवासाचा त्या वेळचा महाबळेश्वर ते महाड असा राजमार्ग होता आणि पार हे गाव या मार्गातील बाजारपेठ म्हणून आणि विश्रांती स्थान म्हणून होते. महाबळेश्वरहून खाली १० मैल उतरल्यावर २ मैलाची ही पारची खलाटी आहे. नंतर पुढे १० मैल पोलादपूरचा घाट उतरावा लागे. त्यामुळे प्रवासी या गावी विश्रांती घेऊनच पुढे जात असत आणि म्हणून रामदास स्वामी या मार्गाने अनेक वेळा येत जात असत. अर्थात स्वामींचे कुलदैवत श्रीरामवरदायिनीचे मंदिर याच गावात असल्यामुळे या आदिशक्तीचे दर्शन घेऊनच पुढील प्रवास होत असे.

 

शिवाय जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचा पाडाव होऊन संपूर्ण रायरी पासूनचा सर्व परिसर शिवरायांच्या ताब्यात आला. तेव्हा या स्वराज्यात आपल्या कुलदैवतास यवनांचा उपद्रव होऊ नये म्हणून ही तुळजापूरची सापडलेली मूर्ती इतर कुठेही स्थापन न करता ती मूळ ठिकाणावर आणण्याचे प्रयोजनरामदासस्वामींनी केले आणि पुढील संकट निवारण्यासाठी आदिशक्ती तुळजापूर सोडून पश्चिमेकडे पार घाटात आणली.

ऐतिहासिक काळात जावळीच्या राज्याला फार मोठे महत्त्व होते. सह्याद्रिच्या पश्चिम कुशीतील अतिशय डोंगराळ घाटमाथा व जंगलमय भाग तो होता. त्याकाळी सूर्याचे किरण सुद्धा जमिनीवर पडत नसत इतके दाट जंगलया भागात होते. घाटमाथा कृष्णेच्या उगमापासून संगमेश्वरापर्यंत एवढा मुलुख जावळी राज्यात समाविष्ट होता. जावळी हे गांव राजधानीचे मुख्य ठिकाणक्षेत्र महाबळेश्वराच्या अगदी पायथ्याशी वसलेले होते. 

जावळीपासून पश्चिमेला ५ किलोमीटर अंतरावर पार हे गाव आहे. १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात आदिलशाहाने मोऱ्यांना या शिर्के, महाडिक, गुजर, मोहिते आदि मराठे सरदारांवर पाठवून त्यांचा पराभव करविला व हा प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट करुन घेतला. मोऱ्यांच्या य श्री कामगिरीवर खूष होऊन आदिलशाहाने मोरे यास चंद्रराव हा किताब देऊन जावळीच राजा केले. 

त्या बाजूच्या मावळातील अवघड प्रदेश मोऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतला. आदिलशहाने जरी मोऱ्यांना हा मुलुख दिला तरी ते म्हणत “आमचा राजा श्रीमहाबळेश्वर व कुलस्वामिनी श्री ॐ रामवरदायिनी आहे व त्यांच्याच कृपेने आम्ही राज्य करतो. आपल्याला प्राप्त झालेले वैभव हे शिवशक्तीचे कृपादान आहे अशी त्यांची श्रद्धा होती. यादवांच्या काळातीलश्री महाबळेश्वर व पारघाटातील रामवरदायिनी (भवानी) या देवतांच्या उपसानेत मोरे स्वतःला धन्य मानत असत. त्याचप्रमाणे जावळी राज्यातील श्रीक्षेत्र मल्लिकार्जुन देऊळ बांधून त्या देवास उचाट, आरव, शिंदी, वलवण या गावांची थोडी थोडी जमिन काढून देवास इनाम दिले व जंगम पुजारी ठेवला. तसेच श्रीक्षेत्र चकदेव या देवासही शिंदी वळवण या गावी जमीन देऊन जंगम पुजारी ठेवला. अशारीतीने त्याकाळी मोऱ्यांनी जमिनी, वर्षासने देऊन ६ पुजाऱ्यांची नेमणूक करुन सर्व देवदेवतांच्या नित्य पूजा-अर्चेची व्यवस्था करुन ठेवली होती. 

आपण जावळीचे राजे आहोत. आपल्या सात पिढ्यांनी या जावळीवर राज्य केले आहे. पारच्या श्रीरामवरदायिनीच्या कृपेने कोणताही राजा आपणांस उपद्रव देवू शकत नाही. अशी त्यांची श्रद्धा होती. त्यामुळे या देवस्थानला पूर्वीपासून राजाश्रय होता.श्री समर्थ भक्त श्री शंकररावजी देव यांना चिटणीसांच्या बोरगांवकर दप्तरांत एक महत्त्वाचा अस्सल मोडी कागद मिळाला आहे. 

या कागदातील मजकूर पुढील प्रमाणे. चंद्रराव मोरे यानी सीके प्रतापगडी वरदायिनी देवीचे गल्यात सीके बांधून राज्यगेले वेळेस ठेविले ते तैसिची होते. ते पँट साहेब इंग्रजानी पहावयास आणविले. ते जावळीचे मामलेदारानी पाठविले, ते हे उठविले. “छ २१ सवाल १२२१ सु” इ-हिदे अशरीन मया तैन व अलफ १ ऑगस्ट सन १८२० इसवी या कागदावर दोन शिक्के व दोन मोर्तब उठविले आहेत. मोर्तबावर श्री रामवरदायिनी असे देवीचे नाव असून शिक्यामध्ये या शब्दात रामवरदायिनीचा महिमा वर्णिला आहे.निसर्गाची एकांतता अनुभवण्यासाठी एकवेळ आपण या श्रीरामवरदायिनी मंदिराला भेट दिली पाहिजे.

सहा.प्रा.सुर्यकांत शामराव अदाटे

प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय,

देऊर

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स तर्फे सोलापूरमधील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात

Post Views: 7 कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स तर्फे सोलापूरमधील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात . एकतेचे प्रतीक म्हणून, कराडमधील कोटा

Live Cricket