वेण्णा लेक बोटक्लब बोटमन यांचे उपोषण स्थगित; माजी नगरसेवक संतोष शिंदे आणि शिवसेना शहरप्रमुख विजय नायडू यांच्या प्रयत्नांना यश
महाबळेश्वर: येथील प्रसिद्ध वेण्णा लेक येथील नगरपरिषदेच्या बोटक्लबमध्ये कार्यरत असलेल्या बोटमन कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर ४८ तासांनंतर स्थगित करण्यात आले आहे. माजी नगरसेवक संतोष (आबा) शिंदे आणि शिवसेना शहरप्रमुख विजय नायडू यांच्या प्रयत्नांमुळे तसेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथजी ओंबळे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी हा निर्णय घेतला.
महाबळेश्वर नगरपरिषदेच्या बोटक्लबमध्ये १३० हून अधिक बोटी असूनही कायमस्वरूपी केवळ ४ बोटमन कार्यरत आहेत. नगरपरिषदेचे वार्षिक उत्पन्न सुमारे ४.१५ कोटींहून अधिक असूनही कामगारांना न्याय मिळत नसल्याची अनेक वर्षांपासूनची तक्रार आहे. याच पार्श्वभूमीवर, गेल्या २० वर्षांपासून काम करणाऱ्या ५३ बोटमन कामगारांना किमान वेतन मिळावे आणि त्यांच्या इतर मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी सातारा जिल्हा भाजप कामगार मोर्चा सरचिटणीस कुशल बोधे आणि सामाजिक व भाजप पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पंचायत राज मिथुन तळवलकर यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेबाहेर हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते.
४८ तासांपेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या या उपोषणामुळे काही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली. त्यांना जागेवरच वैद्यकीय तपासणी करून उपचार देण्यात आले, तर काहींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपोषणस्थळी शहरातील अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली, मात्र उपोषणकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम होते.
अखेर, उपोषणकर्त्यांची खालावत चाललेली प्रकृती लक्षात घेता, संतोष (आबा) शिंदे आणि विजय नायडू यांनी पक्षश्रेष्ठींशी संपर्क साधला. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथजी ओंबळे यांना महाबळेश्वरमध्ये पाठवण्यात आले. रात्री उशिरा ओंबळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना त्यांच्या मागण्यांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर उपोषणकर्त्यांना लिंबू सरबत देऊन उपोषण स्थगित करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष अफजल सुतार, माजी नगराध्यक्ष प्रकाश पाटील, किसनशेठ शिंदे, विमलताई पार्टे, विशाल तोष्णीवाल, पत्रकार प्रेषित गांधी, राहूल शेलार, शरद झावरे तसेच दत्तप्रसाद जाधव, राजेंद्र पंडित, सचिन गुजर, उस्मान खारकंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपोषण स्थगित झाले असले तरी, कामगारांनी आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. कामगारांच्या मागण्या मान्य होईपर्यंत ते शांत बसणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.





