संरक्षण उत्पादनातील कुशल मनुष्यबळासाठी भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी ठरणार मार्गदर्शक!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीच्या स्थापनेसंदर्भात आयोजित संवाद सत्रात प्रमुख उपस्थिती दर्शवली. भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीची निर्मिती तसेच भविष्यातील वाटचाल यासंदर्भात चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
संरक्षण उत्पादन क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योजकांकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून, 3 मध्यवर्ती डिफेन्स कॉरिडॉर निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित तज्ज्ञ व कुशल मनुष्यबळाची आवश्यकता वाढली आहे आणि भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीचे योगदान या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. भविष्यातील गरजा ओळखून विद्यापीठाने अभ्यासक्रम आखावेत, तसेच आयआयटी मुंबईप्रमाणे जागतिक दर्जाचे विद्यापीठ म्हणून विकसित व्हावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीची सुरुवात करतांना संरक्षण उत्पादन तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग घेण्यात येत असून विद्यापीठाचा अभ्यासक्रम तसेच नवसंशोधन, तज्ज्ञ मनुष्यबळ निर्मिती तसेच संरक्षण क्षेत्राची गरज लक्षात घेवून विविध अभ्यासक्रमांचा समावेश व्हावा. जागतिक स्तरावर संरक्षण क्षेत्रात नवतंत्रज्ञानाची मागणी वाढत आहे. या क्षेत्रातील उत्पादनाची गुणवत्ता तसेच प्रमाणीकरण यावर विशेष भर देण्याची आवश्यकता आहे. भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी ही संरक्षण उत्पादन क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान संस्था म्हणून विकसित होत असून, उद्योजकांसाठी ती मार्गदर्शक ठरणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे संरक्षण उत्पादन व निर्यातीला प्रोत्साहन मिळाल्याने नागपूर येथे संरक्षण उद्योगांचा विकास सुरू झाला असून, नागपूर हे संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहे. या पार्श्वभूमीवर भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीचे महत्व आणखी वाढते, विद्यापीठामार्फत पदवी, पदविका आणि मास्टर प्रोग्राम सुरू होत असून त्यामध्ये संरक्षण उत्पादन व तंत्रज्ञान, लिडरशीप अँड मॅनेजमेंट, इनोव्हेशन अँड डिझाईन, आंतरराष्ट्रीय संबंध व पब्लिक पॉलिसी तसेच नॉन-कन्व्हेन्शनल डिफेन्स स्टडी यांसारखे अभ्यासक्रम असतील.
यावेळी भारतीय लष्कराचे निवृत्त लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, भारतीय हवाई दलाचे निवृत्त उपप्रमुख एअर मार्शल शिरीष देव व इतर मान्यवर उपस्थित होते.
