परखंदी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान नियोजन बैठक उत्साहात संपन्न
परखंदी, ता. वाई : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या परखंदी, ता वाई या गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीचे नियोजन केले आहे. यासाठी नुकतीच युवा नेते विराज शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान योजनेच्या शासन निर्णयाचे जाहीरपणे वाचन करण्यात आले. तसेच या अभियानात सहभागी व्यक्ती आणि घटकांच्या जबाबदारीचे वाटप करण्यात आले.
यासंदर्भात माहिती देताना विराज शिंदे म्हणाले की, शासनाने मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना अभियानाची सुरुवात केली आहे. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामविकासाला चालना देणे आणि त्यातून राज्याचा विकास साधणे हा हेतू आहे. तो साध्य करण्यासाठी मौजे परखंदी हे गाव पुर्णतः सज्ज असून या अभियानात सहभागी होऊन प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. यासाठी पारंपरिक पद्धतींसह नव्या माध्यमांचा देखील आम्ही वापर करणार असून गावातील प्रत्येक व्यक्ती या अभियानात उत्साहाने सहभागी आहे.
शिंदे पुढे म्हणाले की, या अभियानाच्या माध्यमातून गावात नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून घरपट्टी भरलेल्या खातेदारांमधून लकी ड्रॉ काढून विजेत्याला बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच ज्या वार्डामध्ये उत्कृष्ट कामगिरी होईल त्या वार्डाला देखील विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय महिला बचत गटांसाठी देखील विविध बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे अशी माहितीही शिंदे यांनी याप्रसंगी दिली.
दरम्यान या अभियानाचे नियोजन करण्यासाठी आयोजीत करण्यात आलेल्या या बैठकीत, गावातील प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदाऱ्यांचे पालन करीत लोकसहभाग वाढवावा, जनजागृतीसाठी प्रचार–प्रसार करावा तसेच विविध उपक्रम राबविण्यासाठी आपले योगदान द्यावे असे ठरविण्यात आले. या नियोजन बैठकीत गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.
या बैठकीला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत कार्यकारिणी सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी, गावातील आजी–माजी पदाधिकारी, महसूल अधिकारी, वनरक्षक, पोलीस पाटील, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, कृषी अधिकारी, आरोग्य सेवक, आशा सेविका, महिला बचत गटांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, युवक मंडळाचे प्रतिनिधी, शेतकरी गट तसेच ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
