महाराष्ट्र शासन आणि टाटा टेक्नॉलॉजीज् यांच्या संयुक्त भागीदारीतून विकसित महाराष्ट्राच्या दिशेने मोठे पाऊल!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रामटेक, नागपूर येथे महाराष्ट्र शासन आणि टाटा टेक्नॉलॉजीज् लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत रामटेक, नागपूर येथे ‘सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्व्हेन्शन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर (CIIIT)’ उभारण्यात येणार आहे.
खासगी सहभागातून उभारण्यात येणारे हे CIIIT केंद्र विद्यार्थ्यांना अत्याधुनिक नवउपक्रमांवर आधारित प्रशिक्षण देणार असून, औद्योगिक उत्पादन व रोजगाराला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. दरवर्षी 3000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा येथे उपलब्ध होईल. कौशल्यवर्धन केंद्र इमारत बांधकाम व प्रशिक्षण सुविधासह ₹115 कोटींचा प्रकल्प असून टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडतर्फे ₹98 कोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
नवउपक्रम व संशोधन प्रशिक्षण सुविधा असलेल्या रामटेक येथील प्रकल्प टाटा टेक्नॉलॉजीज् लिमिटेड व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणार आहे. या कौशल्यवर्धन केंद्रात इनोव्हेशन, डिझाईन, इन्क्युबेशन यासह 9 प्रकारच्या प्रशिक्षण सुविधा राहणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
