विमुक्त जाती आणि भटक्या जमातींसाठी महाबळेश्वर तालुक्यात विशेष मोहीम
महाबळेश्वर: इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मुंबई यांच्या २८ ऑगस्ट २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती (VJNT) प्रवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे, प्रमाणपत्रे आणि विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यात विशेष मोहीम राबवली जात आहे. याच अनुषंगाने, १२ सप्टेंबर २०२५ रोजी महाबळेश्वर तालुकास्तरीय समिती सदस्य आणि क्षेत्रीय अधिकारी-कर्मचारी यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत तहसीलदार श्री सचिन मस्के यांनी सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. या सूचनांनुसार, तालुक्यातील VJNT समाजातील पात्र लाभार्थ्यांची माहिती तात्काळ संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, पुढील पंधरा दिवसांत विशेष शिबिरांचे आयोजन करून लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे गोळा करण्याचे आणि त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आदेशही देण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत, महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आपली सर्व आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्न दाखला, नॉन-क्रिमीलेअर, रहिवास प्रमाणपत्र, अधिवास दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, इ.) संबंधित गावातील ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी किंवा महसूल सेवक यांच्याकडे जमा करावीत.
या शिबिरांमध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ अर्थसहाय्य योजना, लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना, ॲग्रोस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी आणि इतर सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. तहसीलदार सचिन मस्के यांनी VJNT समाजातील सर्व पात्र लाभार्थ्यांना या शिबिरांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ही मोहीम VJNT समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल अशी अपेक्षा आहे.
