‘व्हिजन डॉक्युमेंट 2047′ : विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘विकसित महाराष्ट्र 2047’ व्हिजन डॉक्युमेंटच्या मसुद्याच्या सादरीकरणासंदर्भात बैठक संपन्न झाली. पाणी, वीज, शिक्षण, सामाजिक कल्याण, उद्योग आणि सेवा, तंत्रज्ञान, अर्थकारण या क्षेत्रांसंदर्भात आजचे सादरीकरण होते.
‘व्हिजन डॉक्युमेंट 2047’ ही विकसित महाराष्ट्रासाठीची आपली मार्गदर्शक तत्वे आहेत. या व्हिजननुसार भविष्यातील राज्याची धोरणे तयार करावीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
सादरीकरणाबाबत समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री म्हणाले की, सादरीकरण अतिशय चांगले झाले असून, त्यात ‘डीप थिंकिंग’ झाले आहे. आपण योग्य मार्गावर आहोत. पुढील 20-25 वर्षांसाठीचा आराखडा तयार होतो आहे. आपल्या धोरणांची आखणी या व्हिजननुसार होणे आवश्यक आहे. पुढील 5 वर्ष आपण सातत्याने या व्हिजनवर काम केले, तर 2047 मध्ये विकसित महाराष्ट्राचे स्वप्न आपण निश्चितच पूर्ण करू, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सहकार क्षेत्र राज्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यावर अधिक लक्ष द्यावे. उत्तम प्रशासनासाठी माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा. ग्रामपंचायतींना जोडणारा ‘भारत नेट रिंग’ लवकरात लवकर विकसित करावा. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत सहकार्य वाढवावे. देशातील सर्वोत्तम व्हिजन डॉक्युमेंट म्हणून हा आराखडा उभा राहील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे यांच्या गुणवत्तावाढीवरही विशेष लक्ष केंद्रित करण्याचेही निर्देश, मुख्यमंत्री यांनी संबंधितांना दिले.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
