साताऱ्यातील डॉ.विकास फरांदे यांची “निमारन 2025” च्या ब्रँड ॲम्बेसिडरपदी निवड
रुरल हॉस्पिटल ओनर्स अँड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, जिल्हा सातारा या संघटनेचे उपकोषाध्यक्ष डॉ. विकास फरांदे यांची “निमारन 2025” च्या ब्रँड ॲम्बेसिडरपदी एकमताने निवड करण्यात आली.
डॉ. विकास फरांदे हे आनेवाडी आणि करंजे येथे गेली अनेक वर्षे यशस्वीपणे रुग्णसेवा करत आहेत. वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक कार्यालाही त्यांनी तितकेच महत्त्व दिले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेक कुटुंबांना जनता अर्बन बँक, वाई च्या माध्यमातून मदत करून त्यांनी समाजात वेगळी छाप निर्माण केली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना बँकेच्या चेअरमनपदी नियुक्त करण्यात आले होते.
वैद्यकीय व्यावसायिकांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या रुरल हॉस्पिटल ओनर्स अँड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनमध्ये उपकोषाध्यक्ष या पदावर त्यांनी काम करताना अनेक महत्त्वाची पावले उचलली. तसेच रुरल निमा संस्थेमधूनही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
क्रीडा क्षेत्रातही त्यांची भरीव कामगिरी असून सातारा मॅरेथॉन, निमा मॅरेथॉन यांसारख्या स्पर्धांमध्ये त्यांनी नियमित सहभाग घेतला व अनेकदा विजेतेपदही पटकावले आहे.
या निवडीबद्दल डॉ विकास फरांदे यांचे डॉ मनोहर ससाणे, श्री किशोर बोराटे, डॉ दिनेश सूर्यवंशी, डॉ अमोल गायकवाड, डॉ राजेंद्र माने, जावळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत गुजर, धनंजय गोरे, विजय तरडे, लक्ष्मण गायकवाड यांनी अभिनंदन केले. तसेच वैद्यकीय, सामाजिक, राजकीय, आर्थिक, कृषी आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या डॉ. फरांदे यांच्या या निवडीमुळे जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
