खंडाळा पंचायत समितीचा राज्यात नावलौकिक राज्यात चौथा क्रमांक
खंडाळा : पंचायत विकास निर्देशांकामध्ये खंडाळा पंचायत समितीने राज्यात उत्कृष्ट कामगिरी करत चौथा क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामुळे खंडाळा तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पंचायत विकास निर्देशांक हा एक अभिनव उपक्रम असून ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या कार्याचा सर्वांगीण आढावा घेणारा व वस्तुनिष्ठ मोजपट्टी मानला जातो. या निर्देशांकात प्रशासनातील पारदर्शकता, लोकसहभाग, योजनांची प्रभावी अंमलबजावणी, सेवांचा दर्जा, पायाभूत सुविधा, शाश्वत विकास, सामाजिक प्रगती तसेच आर्थिक उन्नती अशा विविध घटकांचा विचार करून गुणांकन करण्यात आले. महाराष्ट्रातील सहभागी झालेल्या विविध पंचायत समितीमधून खंडाळा पंचायत समितीच्या या उल्लेखनीय यश प्राप्तीमुळे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथजी डवले यांच्या हस्ते गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांचा पुण्यात सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील व सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी निलेश घुले यांचे मोलाचे मार्गदर्शन या यशामागील एक महत्त्वाचा घटक ठरला आहे.
तालुक्याचे तहसीलदार अजित पाटील यांच्यासह पोलीस प्रशासन, विविध खात्याचे प्रमुख, बँकांचे शाखाप्रमुख, अग्रणी बँकेचे अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य सर्व राज्य शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्यामुळे यश मिळाले आहे. सर्वाचा समन्वय आणि मेहनतीमुळे खंडाळा तालुक्याने संपूर्ण राज्यात ओळख निर्माण केली आहे. हा सन्मान हा खंडाळा तालुक्यातील जनतेचा आणि प्रत्येक शासकीय सेवकाचा आहे.
