“जीवनमित्र फाऊंडेशन मेढा यांचे वतीने पर्यावरण रक्षणासाठी आगळा वेगळा उपक्रम..”
केळघर(प्रतिनिधी)- जीवनमित्र फाऊंडेशन मेढा यांच्या वतीने काल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेढा या ठिकाणी पर्यावरण पूरक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सातारा येथील युवा शिल्पकार मंदार लोहार याने हाताने शाडूची गणेश मूर्ती कशी बनवायची याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवले.नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न केले पाहिजेत, यासाठी प्लास्टिक, थर्माकोलचा वापर करणे टाळावे, तसेच गणपती उत्सवात तयार होणारे निर्माल्य नदीत विसर्जित न करता ते नगरपंचायतच्या वतीने ठेवलेल्या कुंडीत टाकावे असे आवाहन नगरपंचायत आरोग्य अधिकारी श्री अहीवळे यांनी केले.
आजकाल मुलांच्या हातात मोबाईल जास्त दिसतो त्यामुळे त्यांचे आरोग्य तर बिघडत आहेच शिवाय त्यांच्या मधिल कौशल्य विकसित होत नाही. शैक्षणिक सोबत विद्यार्थ्यांनी इतर छंद जोपासले पाहिजेत यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे मंदार लोहार याने सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जीवनमित्र फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ काशीळकर यांनी मानवी जीवनात असलेले पर्यावरणाचे महत्व समजावून सांगितले तसेच हे प्रदूषण मुक्त ठेवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यानी घेतली पाहिजे. पालक व ग्रामस्थांच्या मदतीने हे काम करण्यास सुरुवात करू या, असे आवाहन केले. दिवाळीच्या सुट्टीत मुलांसाठी याची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. असे या प्रसंगी सांगितले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रंजना सपकाळ यांनी सर्वांचे स्वागत केले. श्री सुधाकर दुदंळे गुरुजी यांनी सूत्रसंचालन केले, विनायक करंजेकर गुरुजी यांनी आभार प्रदर्शन केले. या प्रसंगी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका अनुपमा दाभाडे ,विशाल बेंद्रे व इतर सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीवनमित्र फाऊंडेशनचे खजिनदार व एल.आय.सी ऑफ इंडियाचे विमा प्रतिनिधी श्री सुहास पाटील यांनी परिश्रम घेतले.
