Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » न्यायपंढरीच्या दर्शनासाठी दोन वकिलांची सायकलवारी!

न्यायपंढरीच्या दर्शनासाठी दोन वकिलांची सायकलवारी!

न्यायपंढरीच्या दर्शनासाठी दोन वकिलांची सायकलवारी!

कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटनप्रसंगी दिला फिटनेसचा संदेश

सातारा, (प्रतिनिधी) : साताऱ्यातील वकील ॲड. अजित घाडगे आणि ॲड. पंकज पवार यांनी न्यायासाठी झालेल्या चाळीस वर्षांच्या संघर्षाला सलाम करण्यासाठी आगळा-वेगळा मार्ग निवडला. साताऱ्यातून सायकलिंग करत त्यांनी तब्बल १२५ किलोमीटर अंतर पार करीत कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्यात सहभाग नोंदवला. तब्बल आठ तासांचा हा मजल दरमजल प्रवास त्यांनी पूर्ण करत न्यायलढ्याचा सन्मान जपला आणि पर्यावरणपूरक, आरोग्यदायी जीवनशैलीचा ठोस संदेशही दिला.

गेल्या चार दशकांपासून कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, अशी सातत्याने मागणी होत होती. अखेर ही मागणी सर्किट बेंचच्या रूपाने पूर्ण झाली. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसाठी हे बेंच कार्यरत राहणार आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते १७ ऑगस्ट रोजी झालेल्या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रीमंडळातील सदस्य, आमदार, न्यायमूर्ती, वकील आणि हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रवासानंतर ॲड. अजित घाडगे म्हणाले, ही केवळ सायकल सफर नव्हती, तर चाळीस वर्षांच्या न्यायलढ्याला आमच्या पद्धतीने सलाम करण्याचा प्रयत्न होता. सायकलिंगमुळे फिटनेस टिकतो, पर्यावरण वाचते आणि संघर्षाचा संदेशही पोहोचतो. न्यायालयीन सर्किट बेंच मिळाल्याचा आनंद व्यक्त करण्याचा हा आमच्यासाठी अनोखा मार्ग ठरला.

तर ॲड. पंकज पवार यांनी म्हटले की, न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या पिढ्यांचा सन्मान म्हणून आम्ही हा प्रवास सायकलिंगने केला. साताऱ्यातील नागरिकांना आता न्याय मिळवण्यासाठी कोल्हापूर बेंच जवळ आल्याचा आनंद आहे.

या प्रवासाबद्दल सातारा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सयाजीराव घाडगे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोव्याचे माजी अध्यक्ष ॲड. वसंतराव भोसले यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी

Post Views: 10 सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव

Live Cricket