दि.२२ सप्टेंबर रोजी कर्मवीर जयंती
सातारा -प्रतिनिधी वंचित, गोरगरीब, दुर्गम भागातील, खेड्या पाड्यातील, बहुजनांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणारे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३७ वी जयंती रविवार दि.२२ सप्टेंबर रोजी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी,व्हा.चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी होत असल्याची माहिती सचिव विकास देशमुख यांनी दिली.
दरवर्षी दि.२३ सप्टेंबर रोजी रयत शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील सर्व शाखा, सामाजिक संस्था कडून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सातारा येथील स्थानिक सर्व शाखांच्या वतीने कर्मवीर समाधी परिसर येथे जयंती साजरी होणार आहे. या दिवशी सकाळी ७:३० वा. कर्मवीर समाधीला अभिवादन, शहरातून चित्ररथासह रॅली, यावेळी शहरातील राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
सकाळी ९:३० वा. समाधी परिसरात अध्यक्ष शरद पवार यांचे मार्गदर्शन आणि संस्थेच्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शाखा, विद्यार्थी, सेवकांचा सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमाला सातारकरांना उपस्थित रहावे, असे आवाहन सचिव विकास देशमुख यांनी केले आहे.