जळगाव जिल्ह्यातील अपघातात ११ ठार! मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे पुष्पक एक्स्प्रेसमधून उतरलेल्या प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेसने धडक दिल्याने ११ जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
”जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येईल आणि जखमींचा संपूर्ण खर्च सुद्धा राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे.
जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येईल आणि जखमींचा संपूर्ण खर्च सुद्धा राज्य सरकार करेल.जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
जळगावमध्ये बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. जळगाव आणि पाचोरा स्थानकादरम्यान आग लागल्याच्या भीतीने पुष्पक एक्स्प्रेसमधील अनेक प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. याचदरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने प्रवाशांना धडक दिली. या दुर्घटनेत किमान ११ जणांचा मृत्यू झाला.
११ ठार, ६ जखमी, जळगाव पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
दरम्यान, आतापर्यंत या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे आणि तर ६ जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, कोणाचीही प्रकृती गंभीर नाही, अशी माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवासी गाडीतून खाली उतरून ट्रॅकवर आले होते. त्याचवेळी शेजारील ट्रॅकवरून बंगळूर एक्स्प्रेस जात असताना ही दुर्घटना घडली. उपलब्ध माहितीनुसार, ८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत, रेल्वे आणि रेल्वे रुग्णवाहिकांच्या अतिरिक्त रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत, असे नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम एएनआय वृतसंस्थेशी बोलताना सांगितले.पाचोरा तालुक्यातील परधाडे या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन पोहोचले असून त्यांनी घटनेची पूर्ण माहिती घेऊन जखमींना पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.